
संचमान्यता शासन निर्णय १५ मार्च २०२४ नुसार शाळांतील शिक्षकांची पदे निश्चित केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणच धोक्यात येणार आहे. परिणामी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा मूळ हेतूच नष्ट होईल हे अनेक शिक्षण तज्ज्ञ सातत्याने स्पष्ट करीत आहेत. नवीन संचमान्यता धोरणामुळे केवळ शिक्षकांची पदे कमी होतात यापेक्षाही विद्यार्थ्यांना आपल्या गावात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा हक्क संपुष्टात येऊन मुलांसह अनेक मुलींचे शिक्षण थांबेल यासाठी RTE निकषानुसारच नव्हे; तर २८ ऑगस्ट १९८० मध्ये ठरविलेल्या निकषानुसार शिक्षक देण्यात यावे अशी आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून शासनाकडे सतत विनंती करीत आहोत. सोबतच आधार कार्ड वैधता आधारित संचमान्यता न करता शाळेत प्रवेशित व प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करून संचमान्यता निर्धारण करावे अशीही मागणी आहे.
मात्र वरील दोन्ही बाबतीत दुर्लक्ष होत असल्याने शेवटी नुकसान मात्र विद्यार्थ्यांचेच होणार आहे. संचमान्यता शासन निर्णय १५ मार्च २०२४ ची अंमलबजावणी आणि आधार वैधतेच्या आधारे शिक्षक निश्विती हा विषय केवळ शिक्षकांची पदे कायम राहणे नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी निगडित आहे. ( २) शिक्षण संचालनालयाच्या दि. ४ फेब्रुवारी २०२६ च्या (संदर्भित-१) पत्रात नमूद केल्यानुसार २०२५-२६ ची अंतिम संच मान्यता डिसेंबर २०२५ मध्ये शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध केल्याचे नमूद आहे. मात्र अनेक जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार २०२५-२६ ची दुरुस्ती केलेली अंतिम संच मान्यता जानेवारी-२०२६ मध्ये सुद्धा उपलब्ध झालेली नसून फेब्रुवारी-२६ च्या दुसऱ्या सप्ताहात प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषदांना प्राप्त झालेल्या संच मान्यतेत अद्यापही अनेक त्रुटी आहेत. त्या दुरुस्त केल्याशिवाय समायोजनाची प्रक्रिया राबविणे चुकीचे ठरेल. (३) शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार (संदर्भित-१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन शालेय शिक्षण विभागाच्या दि. १५ मार्च २०२४ च्या (संदर्भित-२)
समायोजन शासन निर्णयानुसार करण्याचे नमूद आहे. जिल्हा परिषदे द्वारा संचालित प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आणि समायोजनाची कार्यपद्धती ग्राम विकास विभागाकडून निश्चित केली जाते.
शालेय शिक्षण विभागाने समायोजनाची कार्यपद्धती निश्चित करणाऱ्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात उल्लेखित अधिक्रमित केलेल्या पूर्वीच्या शासन निर्णयात तसेच सदर शासन निर्णयात ग्राम विकास विभागाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या १२/१८ मे २०११ समायोजनाबाबतच्या शासन निर्णयाचा कुठेही उल्लेख नाही. तसेच शिक्षण संचालनालयाच्या दि. ४ फेब्रुवारी २०२६ च्या पत्रात सुद्धा ग्राम विकास विभागाच्या सदर शासन निर्णयाचा उल्लेख नाही.अर्थात जिल्हा परिषद अधिनस्थ कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या आणि समायोजनाची कार्यपद्धती भिन्न असण्यासोबतच अजूनही ग्राम विकास विभागाचा सदर शासन निर्णय कार्यान्वित आहे. तसेच समायोजनाने बदल्या करण्याचे ग्राम विकास विभागाचे अद्यापपर्यंत कोणतेच आदेश नसल्याने शालेय शिक्षण विभागाच्या समायोजनाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत कार्यरत शिक्षकांचे समायोजन संचालनालयाच्या दि. ४ फेब्रुवारी २०२६ च्या पत्रानुसार करता येत नाही अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आमची ठाम भूमिका आहे. (४) १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन निर्णय अस्तित्वात येण्यापूर्वी शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार विद्यार्थी प्रमाणात शिक्षक पदे निश्चित करून इयत्ता ६ वी ते ७/८ वीसाठी पदवीधर / विषय पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्यात विषय पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत.
१५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेनुसार आता इयत्ता ६ वी ते ७/८ वी मध्ये २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास केवळ गणित-विज्ञान विषयाचे पद मंजूर असल्याने अन्य पदे व्यपगत होत आहे. त्यामुळे अशा शाळेत कार्यरत भाषा विषयाचे शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. मात्र भाषा विषयाचे आणि समाज शास्त्र विषयाच्या अतिरिक्त ठरविलेल्या विषय शिक्षकांच्या समायोजनाबाबत (जिल्ह्यात मान्य होणाऱ्या भाषा, समाजशास्त्र विषय शिक्षकांपेक्षा अधिक असणाऱ्या शिक्षकांच्या संबंधाने) नेमकी काय कार्यवाही करावी यासंबंधाने कोणतेच दिशानिर्देश अद्यापही अप्राप्त आहेत. याचीही संदिग्धता दूर झालेली नाही.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हितास बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीने संच मान्यता शासन निर्णयात बदल व्हावा आणि तत्पश्चात समायोजनाची कार्यपद्धती होऊन संपूर्ण राज्यात एकवाक्यता असावी अशीही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आग्रही विनंती आहे.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख राज्य प्रतिनिधी मारोती वरोकार ज्येष्ठ मार्गदर्शक विजय टोहरे संजय इंगळे गोपाल सुरे प्रशांत अकोत सुधीर डांगे राजेश वानखडे निवृत्ती राऊत विनोद भिसे दिनेश केकन , नागेश सोळंके विशाल घोगले विनोद तळोकार यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
