अकोला | प्रतिनिधी
जिल्हा परिषद अकोला च्या बांधकाम विभागात २० फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशानंतर निर्माण झालेला वाद आता चांगलाच भडकला आहे

. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना आयटीआयमार्फत घेतल्या जाणाऱ्या अडीच महिन्यांच्या प्रशिक्षण व अर्हता परीक्षेतून सूट देण्याच्या निर्णयाविरोधात काही कर्मचाऱ्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेत संयुक्त निवेदन सादर केले. मात्र या निवेदनानेच नवा स्फोट घडवला आहे — संबंधितांनी विभाग प्रमुखांची पूर्वपरवानगी घेतली होती का?

प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे की, सेवा नियमांनुसार कोणतेही सामूहिक निवेदन वरिष्ठांकडे देताना विभाग प्रमुख किंवा कार्यकारी अभियंता यांना माहिती देणे आवश्यक असते. जर ही प्रक्रिया डावलून थेट सीईओंकडे निवेदन गेले असेल, तर तो गंभीर शिस्तभंग ठरू शकतो. “आदेशावर प्रश्न उपस्थित करणं वेगळं, पण शिस्त मोडणं वेगळं,” अशी दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, निवेदन देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाच्या २००६, २०२१ व २०२३ च्या मार्गदर्शक सूचनांशी आदेश विसंगत असल्याने त्यांनी न्याय्य मार्गाने आपली बाजू मांडली. “हक्कासाठी आवाज उठवला तर शिस्तभंग म्हणायचा का?” असा त्यांचा सवाल आहे.
या प्रकरणामुळे विभागात दोन गट पडल्याचे चित्र आहे. एक गट आदेशाचे समर्थन करत असून दुसरा गट प्रक्रिया आणि सूट देण्याच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आता लक्ष आहे ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पुढील भूमिकेकडे — विभाग प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागवले जाणार का? निवेदन देणाऱ्यांवर कारवाई होणार का? की संपूर्ण आदेशाचीच फेरतपासणी होणार?
बांधकाम विभागात सध्या वातावरण तंग असून, हा वाद केवळ प्रशिक्षणाच्या सूटपुरता मर्यादित न राहता शिस्त आणि अधिकाराच्या लढाईत परिवर्तित होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
