अकोला, दि. २३ फेब्रुवारी :
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या वतीने आयोजित वऱ्हाडी जत्रा मिनी सरस प्रदर्शन २०२६ या भव्य दिव्य प्रदर्शनाचा आज चौथा दिवस मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला. दिनांक २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नवउद्योजिका महिलांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणे, त्यांच्या कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे.
तिसऱ्या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक सोहळा. महिला विश्वातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी मुक्तछंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत अनेकांनी गीत, नाटिका, भजन, नृत्य यांसारख्या कलाप्रकारांद्वारे मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनही केले. कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी वसंतजी खंडेलवाल, हरीश पिंपळे तसेच गोपीकिशन बाजोरिया यांनी प्रदर्शनास भेट देत महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांनी वातावरण रंगले होते. उमेश आगरकर यांच्या ‘वन मिनिट गेम शो’ने उपस्थितांना विशेष आनंद दिला. तसेच तेलंगणातील प्रसिद्ध डप्पू लोकनृत्य, मध्यप्रदेश बुंदेलखंड येथील बधाई लोकनृत्य आणि महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणाऱ्या सोंगी मुखवटे यांचे सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेले. डॉ. रमेश थोरात यांच्या ‘बकरी शेर खा गयी’ या एकपात्री प्रयोगालाही भरभरून दाद मिळाली. लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
आजही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून तेलंगणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकनृत्यांचे सादरीकरण तसेच किशोर बळी यांचा ‘सारं गाव मामाचं’ हा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे.
या भव्य ‘उमेद वऱ्हाडी जत्रा मिनी सरस प्रदर्शना’ला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी केले आहे.
उमेद’ अंतर्गत वऱ्हाडी जत्रा मिनी सरस प्रदर्शनाचा चौथा दिवस उत्साहातमहिला सक्षमीकरणाला नवी दिशा; सांस्कृतिक सोहळ्यांनी रंगत वाढवली
