अकोला : मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लाठी-काठी (सिलंबम) स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ दि. १७/०४/२०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
हे मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर दि. ०५/०४/२०२६ ते १५/०४/२०२६ या कालावधीत MH 30 हॉटेल समोर, गजानन वाटिका, गली नंबर १, गुळदी रोड, अकोला येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या उपक्रमाचे नेतृत्व राज्य प्रमुख डॉ. खुशबू चोपडे यांनी केले.
या शिबिरासाठी आमदार रणधीर भाऊ सावरकर, नगरसेविका सौ. पल्लवी मारे, नगरसेविका सौ. शिल्पा वरोकार, नगरसेवक संदीप शेगोकार, मा. नगरसेवक मिलिंद राऊत, पूर्व मंडल अध्यक्ष संदीप गावंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
समारोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. सुहासिनी ताई धोत्रे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक संदीप शेगोकार, नगरसेविका शिल्पा वरोकार, पूर्व मंडल अध्यक्ष संदीप गावंडे, नगरसेविका सौ. निकिता देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान खेळाडूंनी सिलंबम लाठी-काठी स्वसंरक्षणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरात मुख्य मास्टर ट्रेनर सिहान अरुण सारवान यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे सहभागींच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांना स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करता आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा काळे, अक्षत गडेचा, सोहम निखाळजे, फ्लोरन्स नासिकर, मिनल चोपडे, सविता पिंजकर, प्रिती तायडे,साक्षी जोगे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खुशबू चोपडे यांनी केले.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात स्वसंरक्षण ही अत्यावश्यक गरज बनली आहे. विशेषतः महिला, मुली व विद्यार्थ्यांनी अशा प्रशिक्षणाचा लाभ घेणे गरजेचे असून, या प्रशिक्षणामुळे शारीरिक ताकद, मानसिक धैर्य आणि संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
घोषवाक्य
“स्वसंरक्षण शिका – सुरक्षित जीवन जगा!”
मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात
