Join WhatsApp group

दाणापूर ग्रामपंचायत च्या प्रशासकला हटविण्याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी!


अकोला, प्रतिनिधी :
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत दाणापूर येथील प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामपंचायत सदस्य गोपाल माधवराव विखे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. प्रशासक स्वतः कारभार न पाहता त्यांच्या पतीकडून कथितरीत्या प्रशासनात थेट हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, दाणापूर येथे झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत प्रशासकांच्या ऐवजी त्यांच्या पती उपस्थित राहून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत बैठकीची कार्यवाही पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बैठकीचे छायाचित्र आरोग्य विभागाच्या अधिकृत समूहात प्रसारित झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनधिकृत हस्तक्षेप, विरोधी सदस्यांच्या प्रभागातील विकासकामे कथितरीत्या अडविणे, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अहवाल तयार करून घेणे, माहिती अधिकार व ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागविलेली माहिती न देणे, तसेच नागरिकांच्या अर्जांमध्ये पक्षपातीपणा केल्याचेही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.
तक्रारीत आणखी एक गंभीर मुद्दा मांडण्यात आला असून, जन्म-मृत्यू दाखले व मालकी हक्काच्या मूळ नोंदी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज जाणूनबुजून गहाळ करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात नागरिकांना मोठा त्रास होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या मते, हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, माहितीचा अधिकार कायदा २००५ आणि पारदर्शक प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासकांना पदावरून हटवावे.
मुख्य मागण्या :
विद्यमान प्रशासकांना तात्काळ पदावरून हटविणे.
पंचायत समिती तेल्हारा येथील शासकीय अधिकाऱ्याची नवीन प्रशासक म्हणून नियुक्ती करणे.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करणे.
सदर तक्रारीसोबत रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीचे छायाचित्र पुरावा म्हणून जोडण्यात आले असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.
आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *