अकोला : कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकल कुंभार समाज विकास परिषद, अकोला यांच्या वतीने मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.
कुंभार समाज पारंपरिकरित्या मूर्तीकाम, गाडगे, मडकी तसेच वीट व्यवसायाशी निगडित असून माती व इंधनाच्या प्रश्नांमुळे समाज अडचणीत सापडला आहे. माती उत्खननासाठी पटवारी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयांकडून होणारा त्रास त्वरित थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच ९ मार्च २०१८ रोजी मा. श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने “श्री संत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्ड” स्थापन करण्याची घोषणा केली होती; मात्र सात वर्षे उलटूनही बोर्ड कार्यान्वित न झाल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
श्री संत गोरोबा काका महाराष्ट्र माती कला बोर्ड त्वरित कार्यान्वित करून येत्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करावी.
राज्याच्या विधान परिषदेत कुंभार समाजाला प्रतिनिधित्व द्यावे.
संत गोरोबा काका यांचे जन्मस्थान तेर (जि. धाराशिव) येथे देहू-आळंदीप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवावा.
मातीवरील रॉयल्टी पूर्णतः माफ करावी व ७०० ब्रासपर्यंत माती उत्खननास नोव्हेंबर ते ३१ मे या कालावधीत परवानगी द्यावी.
कुंभार खाणीवरील अतिक्रमण दूर करून स्वतंत्र खाणी उपलब्ध करून द्याव्यात.
कुंभार कारागिरांना दरमहा ५,००० रुपये मानधन मंजूर करावे.
भटक्या प्रवर्गात समावेश करून २% स्वतंत्र आरक्षण द्यावे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कुंभार कला व मूर्ती कला विषय सुरू करावा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करावेत.
नागपूर येथील ४३० वीट व्यावसायिकांसाठी स्वतंत्र “ब्रिक्स झोन” उपलब्ध करून द्यावा.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील कारागिरांना वन विभागाकडून जळाऊ लाकूड सवलतीच्या दरात द्यावे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय वाडकर यांनी सांगितले की, कुंभार समाज गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे; मात्र समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदन देतेवेळी प्रा. दिलीप अफतूरकर, प्रा. नंदकिशोर थुटे, पुंडलिक वनकर, रामचंद्र मेहरे, अशोकराव मांगूळकर, मनोज बनचरे, महेश डवरे, ॲड. अरुण सौदागर, इंजि. नितेश मेहरे, मनोज लोंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी फडणवीसांना निवेदनसकल कुंभार समाज विकास परिषदेचा इशारा – न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन
Oplus_16908288
