
अकोला जिल्ह्यातील अनुसुचित जाती-जमाती तसेच भटक्या विमुक्त समाजातील भूमिहीन गायरान धारक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार तसेच दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गायरान धारकांना जमिनीचे कायम पट्टे मिळणे अपेक्षित असताना, अद्यापही शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी ई-क्लास व एफ-क्लास गायरान जमिनी कसत आहेत. त्यांनी दंडाच्या पावत्या, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे अहवाल, तहसिलदार पंचनामा, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव नमुना-८ अशा सर्व सबळ कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला आहे. तरीसुद्धा त्यांची दखल घेतली गेलेली नाही.
रौंदळा, बांबर्डा, कट्यार , वरूळ, जउळका, देवर्डा या गावांतील भूमिहीन शेतकऱ्यांना न्यायालयाने देखील आदेश दिले असतानाही कायमपट्ट्यांचा प्रश्न अनुत्तरीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान होत असतानाही प्रशासन मात्र मौन बाळगून आहे.
या गंभीर दुर्लक्षामुळे संतप्त शेतकऱ्यांनी २० सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही आज यावेळी देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विविध गायरान धारक संघटनाही एकत्र आल्या आहेत. शासनाने तातडीने गायरान धारकांना कायम पट्ट्यांचे वाटप करून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी संघर्षाची तयारी करू लागले आहे.
