अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांनी शासनाद्वारे अनुदानित होली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेविरोधात गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इयत्ता चौथी ते पाचवी प्रवेश प्रक्रियेत शाळा प्रशासनाकडून पालकांकडून तब्बल १० ते २० हजार रुपयांपर्यंत भरमसाठ डोनेशन घेतले जाते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे या डोनेशनची कोणतीही पावती पालकांना दिली जात नाही. शाळा शासनमान्य अनुदानित असूनही विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी आकारली जाते, विविध कार्यक्रमांच्या नावाखाली वेगवेगळे पैसे मागितले जातात, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात रणजीत राठोड यांनी तक्रार अर्ज सादर करून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आर्थिक पिळवणुकीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांनी असा इशाराही दिला की, जर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा प्रशासन व शाळा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारेल शाळेच्या कारभारातील इतर अनेक गंभीर बाबी तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत. वर्गात ठासून-ठासून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यात आली असून, अनेक विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसायलाही जागा नाही. परिणामी मुलांना दप्तर, लंच बॉक्स व पाण्याच्या बाटल्या वर्गखोल्याबाहेर किंवा फळ्याजवळ ठेवाव्या लागतात. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना होते. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे बाकी असतात त्यांचा सर्वांसमक्ष अपमान केला जातो, असा आरोप पालकांनी केला आहे.तक्रारीच्या गांभीर्याची दखल घेत अखेर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोला श्री. व्ही. पी. मानकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. गोपाल सुरे व केंद्रप्रमुख या चौकशी समितीत सामील आहेत. समितीला सर्व बाबींची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, चौकशी पूर्ण होईपर्यंत शाळेच्या नव्या कर्मचारी भरती प्रक्रियेवरील प्रशासकीय मान्यता थांबविण्यात यावी, तसेच वेतन व अनुदान थांबवावे, अशी मागणीही मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.शासन अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी किंवा डोनेशन घेणे हे नियमबाह्य असून, अशा शाळांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. आता होली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेविरुद्ध नोंदविलेल्या गंभीर आरोपांवर चौकशी समिती काय अहवाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणामुळे अकोल्यातील पालक व विद्यार्थी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आम्ही शासन अनुदानित शाळेत आमच्या मुलांना प्रवेश देतो, पण तरीही डोनेशन व फीच्या नावाखाली आमची लूट होते. जर शासन अशा शाळांवर कारवाई करणार नसेल तर आम्हाला न्याय कुणाकडून मिळणार?” असा सवाल पालकांनी केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांनी स्पष्ट केले आहे की, “शासनाने त्वरित चौकशी करून या शाळेच्या गैरव्यवहारावर कारवाई करावी. विद्यार्थ्यांना स्वच्छ, मोकळ्या वातावरणात शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार हिरावला गेला तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू.”अखेर शासनाने आदेश दिल्याने या चौकशीचा निकाल काय लागतो आणि शाळा प्रशासनावर काय कारवाई होते याची उत्सुकता जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी व नागरी समाजामध्ये आहे.
होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या गैरव्यवहारावर पडदा उघडा– रणजीत राठोड
