अकोला | प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतर १९५० पासून देशात आणि राज्यात विकासकामांना गती देण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण, वीज निर्मिती, औद्योगिक क्षेत्रे, कृषी विद्यापीठे, विमानतळ अशा विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र या विकासाच्या प्रक्रियेत ज्यांच्या जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी केला आहे.

राज्यात सध्या सुमारे दोन कोटी पन्नास लाखांपर्यंत प्रकल्पग्रस्तांची संख्या असून, त्यापैकी चार ते पाच लाख तरुण शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पासाठी जमीन देताना नोकरीचे आमिष दाखवले गेले; परंतु प्रत्यक्षात केवळ ५ टक्के आरक्षणामुळे अल्प प्रमाणातच नियुक्त्या झाल्याचे धनाडे यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प, मुळा धरण, विदर्भातील अप्पर वर्धा प्रकल्प, गोसेखुर्द प्रकल्प, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध सिंचन व औद्योगिक प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांनी जमीन गमावली. १९५० ते २०१३ दरम्यान मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन झाले; मात्र मोबदला कवडीमोल देण्यात आला आणि पुनर्वसनाचा प्रश्न कायमच राहिला, असा आरोप त्यांनी केला.
विकासकामांसाठी जमीन घेताना लोकप्रतिनिधी मोठमोठी आश्वासने देतात; परंतु विधानसभेत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर प्रश्न उपस्थित करताना दिसत नाहीत. गेल्या काही अधिवेशनांत हा मुद्दा नगण्य ठरल्याचेही धनाडे यांनी स्पष्ट केले. “जणू काही प्रकल्पग्रस्तांनी जमीन दान दिली,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ५ टक्क्यांवरून १५ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटून गेले तरी त्याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. जर १५ टक्के आरक्षण लागू झाले, तर मोठ्या प्रमाणावर प्रकल्पग्रस्त युवकांना शासकीय सेवेत संधी मिळेल आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, असे मत धनाडे यांनी मांडले.
सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेने मंत्रालयात अनेक मंत्र्यांना निवेदने दिली असली तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात; परंतु अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर कोणी ठाम भूमिका घेत नाही, ही शोकांतिका असल्याचे धनाडे म्हणाले.
“सत्ता कोणाचीही असो, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सर्वच सत्ताधारी दुर्लक्ष करतात. येत्या अधिवेशनात आणि निवडणुकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुन्हा विधानसभेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय प्रकल्पग्रस्तच घेतील,” असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या ३० वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी संघटना लढा देत असून, आता आरक्षणवाढ आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
