अकोला: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘नाविन्यपूर्ण उपक्रम विज्ञानवेध’ कार्यक्रमातील निवड चाचणीद्वारे निवडलेल्या जिल्ह्यातील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO), बेंगलोर तसेच दक्षिण भारतातील विविध सांस्कृतिक स्थळांना भेटी देणाऱ्या विशेष शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पथकाला आज, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात रवाना करण्यात आले.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात, जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनिता मेश्राम यांनी या विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांचीही उपस्थिती होती.
या दौऱ्यासाठी निवडलेल्या ३१ विद्यार्थ्यांना विमानाने बेंगलोर येथे नेण्यात येणार आहे. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रोच्या अत्याधुनिक सुविधा पाहण्याची आणि अंतराळ विज्ञानाची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच, दक्षिण भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या विविध ठिकाणांनाही भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा दौरा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती मीना आणि सीईओ श्रीमती मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विद्यार्थ्यांसोबत दोन विस्तार अधिकारी, एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन शिक्षक असे पथक रवाना झाले आहे.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्या लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रोशनी बंसल या मुलांचा उत्साह वाढविण्या साठी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये या दौऱ्याबाबत प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळेस पालकांचा उत्साह सुद्धा मोठ्या प्रमाणात होता दिसत होता. यावेळेस विविध संघटनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
जिल्हा वार्षिक योजना: ‘विज्ञानवेध’ अंतर्गत ३१ विद्यार्थ्यांचा इस्रो व दक्षिण भारत शैक्षणिक दौरा; जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी
