· जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन · एमपीएससीच्या उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळणार
अकोला, दि. ३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, उद्या 4 ऑक्टोबर रोजी अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
याचवेळी एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील नियुक्ती आदेश वितरण सोहळा दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याचा मुख्य कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे.पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाद्वारे सव्वाशेहून अधिक उमेदवारांना नियुक्त आदेश वितरित होणार आहेत. नियुक्ती आदेश मिळणारे सर्व उमेदवार, संबंधित नियुक्ती प्राधिकारी व नागरिकांनी नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर अनुकंपाधारक उमेदवारांना व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपिकवर्गीय उमेदवारांनाही जिल्हानिहाय नियुक्ती देण्यात येत आहे. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल.
शासकीय नोकरीत असताना कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
०००
