अकोला, दि. १ ऑक्टोबर –
बाळापुर तालुक्यातील गायगांव ग्रामपंचायतीत तब्बल 2.25 कोटी रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असल्याचा आरोप ग्रामस्थांसह छावा संघटनेने केला आहे.
ग्रामपंचायत सचिवाने संगणमताने सामान्य फंड, पाणीपुरवठा फंड, अनुसूचित जाती-नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना तसेच 15 वा वित्त आयोगाचा निधी आणि शासकीय शाळा, अंगणवाडी साहित्य पुरवठा यासाठी असलेला निधी अनधिकृत खर्चातून लाटल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे निवेदनाद्वारे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सचिवाने निधी खर्च करताना कोणतेही अंदाजपत्रक, मुल्यांकन वा तांत्रिक मान्यता न घेता बेकायदेशीर खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या नियमांनुसार 15 व्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या खरेदीसाठी GEM पोर्टल वापरणे बंधनकारक आहे. मात्र, सदर खरेदी प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप आहे.
ग्रामपंचायत गायगांवच्या सन 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षांतील सर्व निधीचा त्रिसदस्यीय चौकशी समितीमार्फत तपास व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. समितीत विस्तार अधिकारी (ग्रामपं.), सहायक लेखा अधिकारी व कनिष्ठ अभियंता स्तरावरील अधिकारी यांचा समावेश करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.
तसेच, चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अन्यथा छावा संघटना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायत निधीतील मोठ्या अपहाराच्या या प्रकरणामुळे गायगांव परिसरात खळबळ माजली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
