अकोला दिनांक 27: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने अभिनव सोल्युशन पुणे या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून अकोला जिल्ह्यातील 274 ग्रामपंचायतींची वेबसाईट एकाच दिवशी तयार करण्यात आली असून उर्वरित ग्रामपंचायतींच्या वेबसाईट तयार करणे प्रक्रियेत आहे. अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या डिजिटलाइजेशन साठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग व सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांचे कडे अभिनव सोल्युशन पुणे या आयटी कंपनीकडून सी एस आर फंडातून मोफत वेबसाईट बनवून देण्याचा प्रस्ताव मिळाला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये या वेबसाईट तयार करण्यात येत आहे. ही वेबसाईट तयार करण्याची प्रक्रिया ऑनलाइनच करण्यात येत असून आयटी कंपनीच्या अभियंत्यांचे या प्रक्रियेला मार्गदर्शन मिळत आहे. गावपातळीवरील ग्रामपंचायत अधिकारी, संगणक परिचालक यांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत पवार, गटविकास अधिकारी पंचायत हरिनारायण परिहार, आपले सरकार सेवा केंद्रा जिल्हा समन्वयक प्रवीण गोळे यांच्या नियोजनातून ही सर्व प्रक्रिया पार पडत आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 274 ग्रामपंचायत यांनी आपली वेबसाईट पूर्ण केली आहे. 535 ग्रामपंचायतींपैकी उर्वरित ग्रामपंचायतीच्या वेबसाईट तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. **निडली अँप मुळे वेबसाईट तयार करणे झाले सोपे…. सामान्यतः कोणतीही वेबसाईट तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजिनियर यांची मदत घ्यावी लागते. मात्र एका आयटी कंपनीच्या प्रतिनिधी मार्फत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी, संगणक परिचालकांनी मिळालेल्या सूचनांच्या आधारे या वेबसाईट तयार केल्या. माहितीच्या आधारे काही बाबींचे डिझाईन सुद्धा केले आहे. आता इतर दस्तऐवज व पूरक माहितीची दालने तेवढी या अनुभवातून तयारी तयार करावी लागणार आहे.
उपक्रमामुळे एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची वेबसाईट तयार करने शक्य झाले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या तांत्रिक टीमला या उपक्रमातून वेबसाईट विषयक विविध पैलू शिकता आले आहेत. एक वेबसाईट तयार करण्यासाठी किमान 15 ते 20 हजार रुपये शुल्क आकारले जाते. मात्र या उपक्रमात ही बचत झाली आहे. या वेबसाईटचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात फायदा होणार आहे.
_ अनिता मेश्राम भा. प्र. से.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला