Join WhatsApp group

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासा करीता मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान मध्ये सहभागी व्हावे- आमदार प्रकाश भारसाकळे

अकोट तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

अकोट : दिनांक 10 सप्टेंबर, तालुका सुंदर व समृध्द असुन तो या पेक्षाही समृध्द कसा करता येईल या साठी तसेच ग्रामीण भागाचा सर्वागीण व शाश्वत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सर्व ग्रामपंचायतींनी राबवावे. बक्षीस तर मिळवायचेच आहेत परंतु सदर अभियान राबविताना, आपल्यामधील ज्या काही उणिवा आहेत त्या दुर करुन नागरीकांना उत्कृष्ट सुविधा प्रदान करण्याच्या उददेशाने सदर अभियानामध्ये काम करावे. गरजु/बेघर लाभार्थीना घरकुल उपलब्ध करुन देताना बांधकामासाठी जागा नाही, अश्या लाभार्थीना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मा. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले.
अकोट पंचायत समिती मधील सभागृह येथे आज बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अकोट तालुक्यातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक यांना मार्गदर्शन करीत होते.
दोन सत्रामध्ये आयोजीत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या तालुका स्तरीय कार्यशाळेत अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.
गावाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातुन चळवळ उभी व्हावी. सदर अभियाना अंतर्गत मिळणारी बक्षीसे, अभियान का व कशासाठी राबवायचे या विषयावर राजेश खुमकर, सहा.गट विकास अधिकारी यांनी आपले प्रास्ताविकमधुन सविस्तरपणे सांगितले.

गट विकास अधिकारी मायाताई वानखडे यांनी सदर अभियाना अतर्गत एकूण सात मुद्यांवर ग्रामपंचायतीना काम करावयाचे असुन त्यामध्ये ग्रामपंचायत कर वसुली, पाण्याचा ताळेबंद करणे, ग्रामपंचायत स्तरावरील संस्थाचे सेवांचे बळकटी करणे व नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रशिक्षण व सादरीकरण मदन बहुरे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी गोपाल मोहोड, राजु रावणकार, हरीष टावरी, राजु भालतिलक, राजु मावलकर, ओम शेंडे तसेच महसुल प्रशासनाचे प्रतिनिधी मनोज मानकर निवासी नायब तहसिलदार अकोट मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेसाठी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व विस्तार अधिकारी, विभाग प्रमुख व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक इत्यादि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. अमेश खारोडे ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी संजय डाबेराव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *