अकोला :- पत्रकारांनी सत्तेच्या विरोधात असले पाहिजे, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध सतत उपेक्षितांचा आवाज म्हणून काम केले पाहिजे. जेव्हा पत्रकारिता अबोल होते तेव्हा समाजावर त्याचे वाईट परिणाम होतात, त्यामुळे अशी स्थिती घातक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी रविवार येथे केले.

ज्येष्ठ पत्रकार अनिल माहोरे यांच्या एकसष्टी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून बर्दापूरकर बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश शुक्ल उपस्थित होते.

बर्दापूरकर यांनी आजच्या पत्रकारितेवर परखड भाष्य करताना अनेक उदाहरणे देत नव्या पत्रकारांना मार्गदर्शन केले. आजच्या काळात पत्रकार कोणत्याही समस्येवर हवा तसा आवाज उठवत नाहीत अशी ओरड होते, त्यात सत्य असल्याचे सांगून ते म्हणाले की पत्रकार सर्जनशील लेखक नव्हे तर व्यवस्थेवरील प्रहरी असतो.

त्याचे काम त्याने इमानेइतबारे करायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. तो स्वतःला लेखक समजायला लागला आहे. माध्यमांच्या जगात कधीकाळी विचार स्वातंत्र्य होते मात्र अलीकडे ते संपले आहे कारण इतर बाबी त्यावर हावी झाल्या आहेत. सध्या पत्रकारांना पत्रकारिता करण्याची किंमतही मोजावी लागते असे सांगून त्यांनी वेगाने घसरणाऱ्या मूल्यांबद्दल काळजी व्यक्त केली.

देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनीही अतिशय परखड शब्दात आपले अनुभव मांडत आजचा पत्रकार सत्य मांडून संपादकांकडे देतो मात्र ते प्रसिद्ध करण्याची हिम्मत अन्य कुण्या संपादकांकडे नसते. त्यामुळे लोक इतर माध्यमातून व्यक्त व्हायला लागले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशोन्नतीने सुरुवातीपासूनच आपल्या पत्रकारांना सत्य आणि परखड लिहिण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे स्पष्ट करत व्यवस्थेच्या विरुद्ध उभे राहण्याची हिंमत सर्वांनी ठेवली पाहिजे असे ते म्हणाले. देशोन्नतीच्या सुरुवातीपासूनचा इतिहास सांगत अगदी कठीण काळात हे वर्तमानपत्र हाती घेतल्यानंतर घ्यावी लागणारी मेहनत आणि एकूणच संघर्षाची परिस्थिती त्यांनी यावेळी विषद केली. यावेळी अनिल माहोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, मिरसाहेब आणि दिनेशजी शुक्ल यांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. या सोहळ्याचे प्रास्ताविक पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी केले. संचालन ॲड.सुधाकर खुमकर यांनी तर आभार प्रदर्शन जावेद जकारिया यांनी केले.

कार्यक्रमाला डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. रणजीत कोरडे, अशोक पटोकार, प्रा. प्रदीप चोरे, प्रा. मधु जाधव, अविनाश देशमुख, शरद वानखेडे, प्रशांत गावंडे, किशोर बळी, प्रा. प्रदीपसिंह राजपूत, रवी पाटील अरबट, पंकज कोठारी, गजानन हरणे, विठ्ठल महल्ले, दिनेश ठोकळ, जगदीश मुरूमकर, विजय मालोकार, योगेश अग्रवाल, संतोष महल्ले, राजेश राऊत, संजय आगाशे, अजय डांगे, महेंद्र कविश्वर, संजय चौधरी, मनीष मोहोड, धनंजय मिश्रा, प्रमोद मुरूमकर, कृष्णा अंधारे, विठ्ठल गाढे पाटील, प्रा. मोहन खडसे, प्रा. सुभास गादीया, मनीष खर्चे, डॉ. अशोक ओळंबे, विनायकराव पवार, चंद्रकांत झटाले, पवन महल्ले, पंकज जायले, संजय कुडूपले, डॉ. संदीप चव्हाण, प्रवीण हटकर, गजानन काळे यांच्यासह पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
