-शेतकऱ्यांना दर्जेदार घरगुती बियाणे व कृषी मार्गदर्शनाचा लाभ
अकोला, दि. ८ जून : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रमाणित, दर्जेदार व उच्च उत्पादनक्षम बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १० व ११ जून २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला (मार्केट यार्ड) येथे भव्य ‘ घरगुती बियाणे महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण विठ्ठल भोर यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी १० जून रोजी सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे, विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाचे सभापती शिरीष धोत्रे उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना (आयएएस), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तहसीलदार अकोला यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि विविध भाजीपाला पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचे अधिकृत स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत. तसेच जैविक खते, सेंद्रिय निविष्ठा, जैविक कीडनाशके यांची माहिती व उपलब्धता करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटीसह विविध शासकीय कृषी योजनांची माहिती देण्यात येणार असून कृषी तज्ज्ञांकडून बीजप्रक्रिया, बियाणे निवड, पीक नियोजन व खरीप हंगाम व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना शुद्ध, प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध व्हावे तसेच बनावट बियाण्यांपासून संरक्षण मिळावे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी सांगितले.
अकोला तालुका व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी बुधवार व गुरवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बियाणे महोत्सवाचा लाभ घ्यावा,खरेदी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी केले आहे.🌱🌱
