२० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसारच शाळा सुरू करण्याचे निर्देश
नागपूर, दि. १० जून : विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या मुद्यावर आज मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. माननीय न्यायमूर्ती अनिल किल्लोर व माननीय न्यायमूर्ती राजेश वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत शिक्षण संचालनालयाने दि. ९ जून रोजी निर्गमित केलेले २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचे परिपत्रक शासनाच्या वतीने सादर करण्यात आले.
सरकारी वकिलांनी न्यायालयास सदर परिपत्रकानुसार आदेश देण्याची विनंती केली. मात्र, याचिकाकर्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने ॲड. डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी शासनाच्या भूमिकेला जोरदार विरोध केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने शासनाच्या भूमिकेबाबत असहमती दर्शवित शिक्षण संचालकांनी जारी केलेला १५ जून किंवा २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला. तसेच दि. २० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसारच विदर्भातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले.
विदर्भात सध्या जागतिक उच्चांक गाठणारे वाढते तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी, “विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मा. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे,” असे म्हटले आहे.
