Join WhatsApp group

१५ व्या वित्त आयोग निधीतील अपहाराची चौकशीची मागणी; वाई (माना) ग्रामपंचायती विरोधात तक्रार


अकोला, दि. १६ जुलै : मुर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत वाई (माना) येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये कथित आर्थिक अनियमितता व अपहार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य अजय यशवंत वानखडे यांनी जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामे झाल्याचे दाखवून संबंधित देयके काढण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे थातूरमातूर, निकृष्ट दर्जाची अथवा बोगस पद्धतीने करण्यात आल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
अर्जदाराने संबंधित विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामांची गुणवत्ता, प्रमाण आणि खर्चाची सखोल पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या तक्रारीची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुर्तिजापूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद अकोला, विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच बांधकाम विभागाचे अभियंता यांनाही देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य अजय यशवंत वानखडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *