Join WhatsApp group

अकोला महानगरपालिकेच्या जनगणना प्रशिक्षणात मोठा गोंधळअनेक कर्मचाऱ्यांना नाश्ता-जेवणच नाही


अकोला : अकोला महानगरपालिका मार्फत सुरू असलेल्या जनगणना २०२६-२७ प्रशिक्षणात आज गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना साधा नाश्ता आणि दुपारचे जेवणही उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महानगरपालिकेने पूर्वीच काढलेल्या अधिकृत दरपत्रक सूचनेनुसार प्रशिक्षण कालावधीत कर्मचाऱ्यांना दररोज दोन वेळा चहा, सकाळी नाश्ता आणि दुपारचे भोजन देण्याची तरतूद करण्यात आली होती. यासाठी शासन निधीतून सुमारे ६ लाख रुपयांचा खर्च मंजूर असल्याचेही नमूद करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आजच्या दिवशी अनेक ठिकाणी कोणतीही खाद्यव्यवस्था दिसून आली नाही.


प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “सकाळपासून प्रशिक्षण सुरू आहे, पण चहा-नाश्ता तर दूरच, पिण्याच्या पाण्याची सुद्धा योग्य व्यवस्था नाही. प्रशासनाने कागदोपत्री योजना दाखवली, पण प्रत्यक्षात काहीच सुविधा दिल्या नाहीत.”


दरपत्रकात स्पष्टपणे वेळा आणि मेनू नमूद करण्यात आला होता. सकाळी ९.१५ वाजता नाश्ता, ९.३० व ४.०० वाजता चहा/कॉफी आणि दुपारी १.३० वाजता जेवण देण्याचे नियोजन होते. मात्र या वेळापत्रकाचा पूर्णपणे भंग झाल्याचे दिसून आले आहे.
या प्रकारामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासन निधी मंजूर असूनही कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा न देणे हा गंभीर प्रकार मानला जात आहे.
कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील प्रशिक्षण सत्रांमध्ये योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *