अकोला, दि. २६ फेब्रुवारी २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर झालेल्या विहिरींचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने बार्शीटाकळी, अकोला, पातूर, बाळापूर आणि मुर्तीजापूर तालुक्यातील ४० ते ५० अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हे शेतकरी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले असून, त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह (मुले आणि पत्नी) उपस्थित राहून सरकारकडून तात्काळ निधी मिळवण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०२५ मध्ये विहिरींसाठी वर्क ऑर्डर आणि तांत्रिक मान्यता मिळाली होती. शासनाकडून जून २०२५ पर्यंत विहिरींचे काम पूर्ण करण्याचे बंधनकारक सांगितले गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज आणि व्याजाने पैसे उभारून विहिरींचे काम स्वतः पूर्ण केले. मात्र, आजतागायत एकही रुपया अनुदान मिळालेले नाही. यापूर्वी १७ डिसेंबर २०२५ रोजीही उपोषण केले होते. त्यावेळी कृषी अधिकारी आणि समाज कल्याण आयुक्त यांनी एका महिन्यात निधी जमा होईल असे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण झाले नाही.
शेतकरी संघटनेने सांगितले की, “आम्ही वारंवार निवेदने दिली, पण विचार झाला नाही. आता आमच्यापुढे दुसरा पर्याय उरला नाही. घरी मरण्यापेक्षा शासन दरबारी मरणे योग्य ठरेल. जोपर्यंत आमच्या खात्यात अनुदान जमा होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.” हे उपोषण २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असून, ते बेमुदत आहे.
योजनेची माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी रु. ४ लाखांपर्यंत) अनुदान उपलब्ध आहे. योजनेचा उद्देश सिंचन सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत ही योजना लागू आहे (काही जिल्हे वगळता).
शेतकऱ्यांची मागणी आहे की, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन सन २०२४-२५ किंवा २०२५-२६ च्या निधीतून अनुदान मंजूर करावे आणि खात्यात जमा करावे. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण आंदोलन तीव्र होत असल्याने लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या या संघर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहिरींचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
oplus_131074
