Join WhatsApp group

पंचायत समिती बार्शिटाकळी मध्ये शासन निर्णयाला हरताळ

Oplus_16777216

पाच-सहा वर्षे एकाच टेबलवर कर्मचाऱ्यांची ‘मक्तेदारी’; प्रशासन मुकेदर्शक?
अकोला | प्रतिनिधी
पंचायत समिती बार्शिटाकळी येथे ग्रामविकास विभागाच्या स्पष्ट शासन निर्णयाला अक्षरशः हरताळ फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टेबलवर जास्तीत जास्त तीन वर्षे आणि एका विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कर्मचारी ठेवू नयेत, असा स्पष्ट नियम असतानाही काही कर्मचाऱ्यांना तब्बल पाच ते सहा वर्षांपासून त्याच टेबलवर “ठाण मांडून” बसवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात अकोल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंतराव देशमुख यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र, इतका गंभीर प्रकार घडत असताना स्थानिक प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या विभागांमध्ये ‘सेटिंग’ संस्कृती?
आवक-जावक, कार्यालयीन आस्थापना, पेन्शन विभाग, ग्रामसेवक आस्थापना, भांडारपाल यांसारख्या संवेदनशील विभागांमध्ये एकाच कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून मक्तेदारी निर्माण झाली आहे. परिणामी
परस्पर संगनमताने फाईलींची अदलाबदल,
काही कर्मचाऱ्यांना झुकते माप,
कार्यालयीन वेळेत अनुपस्थिती,
खोटे दौरे दाखवून बिलांची उचल,
अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची तक्रारीत ठळक नोंद आहे.
गटविकास अधिकाऱ्यांची केवळ आश्वासने?
विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची अनेकदा भेट घेऊन टेबल बदल्या करण्याची मागणी केली. काही वेळा नस्ती काढल्याचे दाखवले गेले; मात्र तीच नस्ती पुन्हा कोणतीही ठोस कार्यवाही न करता प्रलंबित ठेवण्यात आली. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर शासन निर्णयाचा थेट अपमान असल्याचा आरोप होत आहे.
प्रश्न प्रशासनाच्या पारदर्शकतेचा
शासन निर्णय स्पष्ट असताना त्याची अंमलबजावणी का होत नाही?
कोणाच्या संरक्षणाखाली हे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलवर टिकून आहेत?
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसवण्यामागे नेमका कोणाचा स्वार्थ दडलेला आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आता प्रशासनासाठी अपरिहार्य झाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
“शासन निर्णय केवळ कागदावरच का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *