Join WhatsApp group

मुर्तीजापूर पंचायत समितीकडून शासन निर्णयाची पायमल्ली?


पाच वर्षांपासून ‘एकाच ठिकाणी’ ठाण मांडून बसलेले कर्मचारी; वरिष्ठांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष?
मुर्तीजापूर ( मुर्तीजापूर पंचायत समिती मध्ये शासन निर्णयाला अक्षरशः केराची टोपली दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. बदली व कार्यकालाबाबत शासनाने स्पष्ट नियमावली जारी केलेली असतानाही काही कर्मचारी तब्बल पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले असल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात रंगली आहे.
शासनाच्या नियमानुसार ठरावीक कालावधीनंतर बदली होणे अपेक्षित असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांना “मर्जीतील” म्हणून वागणूक दिली जात असून इतरांना मात्र वारंवार बदलीचा फटका बसत असल्याने कार्यालयात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, बदली प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी निवडक कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवली जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामांवरही परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन अधिकच संशयास्पद ठरत आहे. नियम सर्वांसाठी समान असताना काहींना अपवाद का? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा “शासन निर्णय” हे केवळ कागदोपत्री राहणार का? असा संतप्त सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *