पातूर तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळा शिक्षकांअभावी विवंचनेत!
गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बळी; तात्काळ शिक्षक नियुक्तीची मागणी
पातूर तालुक्यातील अवघड व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून, या परिस्थितीमुळे गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती युवा लोकचळवळ अराजकीय विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष अमोल प्रमोद घायवट यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे.
ऑनलाइन बदली प्रक्रियेला तब्बल तीन महिने पूर्ण झाले असतानादेखील पातूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना अद्याप शिक्षक मिळालेले नाहीत. अवघड क्षेत्रातील शाळांना बदली प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे स्पष्ट आदेश असतांनाही प्रत्यक्षात अनेक शाळा शिक्षकांअभावी सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णपणे विस्कळीत झाला असून, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे.
निवेदनात नमूद केले आहे की काही शिक्षकांची बदली आदेशित झाली असून ते रुजूही झाले आहेत; मात्र महत्त्वाच्या आणि अवघड क्षेत्रातील अनेक शाळा रिक्तच आहेत. ही परिस्थिती चिंताजनक असल्याने त्वरित शिक्षक नियुक्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अमोल घायवट यांनी मागणी केली की,
“ऑनलाइन बदली प्रक्रियेत ज्या जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत, त्या सर्व शाळांना तात्काळ शिक्षक नेमावेत, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांचे सुरू असलेले शैक्षणिक नुकसान भरून निघेल.”
स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकरणात गंभीर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
