राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला इशारा, “काटे हटवा, अन्यथा आंदोलन करू”

-जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे मागणी
-राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अकोला पूर्व अध्यक्ष चेतन फुकट यांची मागणी
कुटासा ते कावसा या दनोरी फाटा ते पनोरी मार्गावर बंगाली काट्यांची अतिरेकी वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येचा तातडीने निपटारा न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
सदर रस्ता दैनंदिन प्रवासासाठी, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वाहतुकीसाठी तसेच शेतीसाठी महत्त्वाचा असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या बंगाली काट्यांमुळे वाहनांची वाहतूक अडथळाग्रस्त झाली आहे. अनेक ठिकाणी हे झाडे रस्त्यावरच आली असून, त्याचा थेट अपघातांवर परिणाम होत आहे. वाहने, दुचाकीस्वार, तसेच पादचारी यांना रक्तबंबाळ होण्याच्या घटना घडत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
“हा रस्ता आमच्या गावांचा प्राणवायू आहे. रोज हजारो नागरिक या मार्गाने प्रवास करतात. बंगाली काट्यांमुळे रस्ता जीवघेणा बनला आहे. आम्ही वेळेवर साफसफाईची मागणी करत आहोत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल,” असे मत युवक काँग्रेसचे चेतन फुकट यांनी व्यक्त केले, युवक काँग्रेसचे, कुलदीप नागरे, रोशन ईशांत प्रधान, रोशन झटाले आदी पदाधिकारी उपस्थित होते
