अकोट (जि. अकोला) : शासन निर्णयानुसार १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करणे अनिवार्य असूनही अकोट तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रविण श्रीकृष्ण बायवार या ग्रामपंचायत सदस्यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमानुसार ग्रामसभेचे आयोजन करणे बंधनकारक आहे. त्यांनी याबाबत सरपंच व सचिव यांना २७ जुलै २०२५ रोजीच लेखी अर्ज सादर केला होता. यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोट यांनाही लेखी तक्रार दाखल केली.
तरीसुद्धा ग्रामसभा आयोजित न करता शासन निर्णयाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य बायवार यांनी केला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
