पिंजर: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुधलम गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या सहायक कृषी अधिकारी कैलास वसंतराव बोधडे यांच्यावर गावातील दोन व्यक्तींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार नोंदविण्यात आली आहे.
दि. 24 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या लिखित तक्रारीत बोधडे यांनी म्हटले आहे की, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार ते दुधलम गावात पंचनाम्यासाठी गेले असता त्यांच्या सोबत तलाठी श्री. एस. आर. खंडारेही होते. नियमानुसार ते ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता काही शेतकरी तेथे उपस्थित होते. सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास दुधलम येथील शिवाजी प्रितम पंडीत व त्यांचा मुलगा भिवा शिवाजी पंडीत हे ग्रामपंचायत कार्यालयात आले.
सदर व्यक्तींनी 2023 मधील खरीप हंगामातील सर्व्हेमध्ये आपले नुकसान समाविष्ट झाले नसल्याचा आरोप करत बोधडे यांच्यावर शिवीगाळ केली. परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाही वाद वाढत गेला आणि दोघांनीही बोधडे यांच्यावर धावून जाऊन चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित शेतकरी व महसूल अधिकारी खंडारे यांनी हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांची सुटका केली.
यावेळी शिवाजी पंडीत यांनी उघड धमकी देत म्हटले की, “तु जर पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस, तर मी तुझ्या घरी येऊन तुझा मर्डर करीन.” या घटनेनंतर बोधडे यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे नमूद केले आहे.
शासकीय कर्तव्य बजावत असताना सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला होणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
या घटनेमुळे दुधलम परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी गावोगावी जात असताना त्यांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणे, ही चिंताजनक बाब मानली जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना धमक्या मिळणे व मारहाण होणे हा कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
पिंजर पोलिस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात शासकीय अधिकारी सुरक्षिततेच्या प्रश्नावरुन धास्तावलेले दिसत आहेत.
