Join WhatsApp group

अतिसार थांबवा मोहीम यशस्वीपणे राबवा – अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीअनय नावंदर यांचे आवाहन

अकोला दि. 27 जून : पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसार सारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन या रोगांना अटकाव करण्यासाठी अतिसार थांबवा मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक १६ जून ते ३१ जुलै २०२६ या दरम्यान 15-15 दिवसांच्या 6 टप्प्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यशस्वी अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी केले आहे.
अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसर स्वच्छता आणि योग्य स्वच्छताविषयक पद्धतींचा अवलंब केल्यास या आजारावर मात करता येते. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाय अधिक बळकट करणे, यंत्रणेला सतर्क ठेवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियानावर भर दिला जाणार आहे.
मोहिमेमध्ये ही कामे केली जाणार-

तालुका-ग्रामस्तरावर बैठका घेण्यात येणार असून ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. पाणी योजनेतील स्त्रोतांच्या पाण्याची तपासणी फिल्ड टेस्ट किट च्या सहाय्याने केली जाणार आहे. विद्यार्थी व स्वयंसेवकांना पाणी तपासणीचे प्रशिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा पाईपलाईन मधील गळती शोधणे, त्याची दुरुस्ती करणे – गरज पडल्यास पाईपलाईन बदलविणे, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण करणे, नळाद्वारे पुरवठा होणा-या शेवटच्या घरातील पाण्यात किमान ०.२ पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरोन राखण्यावर भर दिला जाणार आहे.

या अभियानादरम्यान हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी वापर, अन्न स्वच्छतेचे नियम आणि अतिसार प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक गावांची स्थितीची शाश्वतता राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.. पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करुन नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

साथरोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. शुद्ध-सुरक्षित पाणी, परिसर व वैयक्तिक स्वच्छता आणि चांगल्या सवयी याद्वारे 2026 मध्ये अकोला जिल्हा अतिसारमुक्त राहण्यासाठी नागरिकांचे सह‌कार्य अधिक प्रभावी ठरेल त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मिलींद मोरे, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद अकोला यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *