Join WhatsApp group

बीजप्रक्रिया करून पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी : कुलदीप देशमुख

कृषी विभागातर्फे पैलपाडा येथे खरीप हंगाम पेरणीपूर्व मार्गदर्शन सभा

अकोला, दि. ६ जून : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता जमिनीत किमान चार इंच (७५ ते १०० मि.मी.) पाऊस झाल्यानंतरच योग्य बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ कुलदीप देशमुख यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने पैलपाडा येथील हनुमान मंदिरात आयोजित खरीप हंगाम पेरणीपूर्व मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील दीपक नागे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुलदीप देशमुख तसेच तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर उपस्थित होते.

खरीप हंगाम तोंडावर आला असून अकोला तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने विविध गावांमध्ये गावबैठका, शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम, कृषी विभागाच्या विविध मोहिमा तसेच पेरणीपूर्व सभा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सायंकाळी पैलपाडा येथे या मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना देशमुख यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासण्याचे महत्त्व सांगितले. तसेच योग्य बीजप्रक्रिया, बीबीएफ, टोकण व पट्टा पेर पद्धती, सोयाबीन व तूर लागवड तंत्रज्ञान, एल-निनोचा संभाव्य प्रभाव, हुमणी कीड व्यवस्थापन तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांचा संतुलित वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.

तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी कृषी महाविस्तार एआय मोबाईल अॅपचे महत्त्व विशद करून शेतकऱ्यांना त्याचा वापर करण्याचे आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सहायक कृषी अधिकारी संजय जाधव यांनी बियाणे उगवणशक्ती तपासणीचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कृषी अधिकारी नीलेश करस्कार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रगतिशील शेतकरी संदीप नागे यांनी केले.
यावेळी राजेश पंजाबराव देशमुख,ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, सहायक कृषी अधिकारी नितेश घाटोळ, कैलास बोधडे, प्रदीप हगवणे, अश्विन भड, सागर मोरे तसेच गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुयोग दांदळे आणि गोविंदा गुहे, शुभम देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *