अकोला, दि. ३ जून २०२६ : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे नेते सुगत भटकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खत टंचाईचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये बफर झोनमध्ये अडकून पडलेला खतांचा साठा त्वरित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे, युरिया व डीएपी खतांची तातडीने आयात करून पुरेसा साठा उपलब्ध करणे तसेच पेरणीपूर्वी प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर खतांचे वेळेत वितरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना सुगत भटकर म्हणाले की, “खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही शेतकऱ्यांना आवश्यक खते मिळत नाहीत. एका बाजूला बफर स्टॉक गोदामांमध्ये पडून आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी खतांसाठी भटकंती करत आहेत. शासनाने तात्काळ दखल घेऊन प्रश्न निकाली काढावा, अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल.”
या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, खरीप हंगामापूर्वी खतांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खत टंचाईवर महाराष्ट्र शेतकरी संघटना आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन
