अकोला : आरोग्य आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम साधत अकोला शहरातील आस्था योग फाउंडेशन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या योग साधकांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. योग शिक्षक महासंघाचे अमरावती विभाग प्रमुख योगगुरू डॉ. चंद्रकांत अवचार आणि जिल्हा अध्यक्ष डॉ. उल्हास मोकळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला शहरात विशेष प्रतिसाद मिळत आहे.
दररोज सकाळी योगवर्गासाठी येताना साधक घरून पाण्याच्या बाटल्या सोबत आणतात आणि परिसरातील झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करतात. नियमितपणे चालणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक झाडांना नवजीवन मिळत असून परिसर अधिक हिरवागार होत आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत झाडांना पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते. ही गरज ओळखून योग साधकांनी स्वयंस्फूर्तीने ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे केवळ झाडे जगवली जात नाहीत, तर नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जागरूकताही निर्माण होत आहे.
योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या उपक्रमात सर्व वयोगटातील साधक उत्साहाने सहभागी होत आहेत. “योग म्हणजे केवळ शरीराची साधना नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याची जीवनशैली आहे,” असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून, “अशा छोट्या प्रयत्नातून मोठा बदल घडू शकतो,” अशी भावना व्यक्त होत आहे.
‘एक व्यक्ती – एक झाड’ या संकल्पनेतून परिसर हिरवागार ठेवण्याचा दृढ संकल्प आस्था योग फाउंडेशन व महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या योग साधकांनी केला असून, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सकाळच्या योगवर्गातून हरित संदेश – ‘प्रत्येकाने एक झाड जगवूया’
