अकोला, दि. १ मे २०२६ (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्यात योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र योग आयोग स्थापन करण्यात यावा, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघ, अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. याच प्रसंगी योग शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यात योग आयोग स्थापनेबाबत सविस्तर निवेदन दिले.
या निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवित, मागणीवर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या कार्याबाबत उत्सुकता दाखवत सविस्तर माहिती जाणून घेतली.
या वेळी अमरावती विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत अवचार, जिल्हा अध्यक्ष डॉ. उल्हास मोकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गावंडे, जिल्हा पदाधिकारी प्रमोद देशमुख, जिल्हा महासचिव श्रीधर मेतकर, सहकोषाध्यक्ष विनोद देशमुख यांच्यासह संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
संघाच्या वतीने राज्यातील योग शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण व जनजागृती यांना चालना देण्यासाठी स्वतंत्र आयोगाची अत्यंत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज घडविण्याच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्रात योग आयोग स्थापनेची मागणीपालकमंत्र्यांना योग शिक्षक संघाचे निवेदन सादर
