अकोला,
अकोला जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक गजानन ओंकार हरणे यांची अ.भा. मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वामनराव भिलारे आणि राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर यांनी ही निवड जाहीर करत हरणे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातील मराठा समाजात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले हरणे आता संघटनेची धुरा सांभाळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अकोला येथील जिल्हा परिषद नगर, खडकी परिसरातील रहिवासी असलेले गजानन हरणे हे गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत. समाजहितासाठी त्यांनी विविध आंदोलनांमध्ये पुढाकार घेतला असून विशेषतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण करून आपली ठाम भूमिका मांडली होती.
मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवत समाजातील प्रश्नांना आवाज देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना १०० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले असून ‘मराठा समाज भूषण’ पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी ठाम पाठिंबा देत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. मराठा, देशमुख, पाटील आणि कुणबी समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना गजानन हरणे यांना अकोला जिल्ह्यातील सर्व तालुके, शहर आणि महानगर पातळीवर मराठा सेवा संघाच्या शाखा स्थापन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मराठा-देशमुख-पाटील-कुणबी समाजाला एकत्र आणून संघटनात्मक बळकटी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आले आहे.
गजानन हरणे यांच्या निवडीचे अकोला जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा सेवा संघाचे कार्य जिल्ह्यात अधिक व्यापक, प्रभावी आणि संघर्षशील होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी गजानन हरणे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्ध्यावर संघटनेचा विश्वास
