Join WhatsApp group

सोनाळा ग्रामपंचायत घोटाळा उघडकीस येणार? चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषण

सरपंच-सचिवांच्या कारभारावर गंभीर आरोप; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा संतोष उके मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करताना

सोनाळा (ता. जि. अकोला) | प्रतिनिधी
ग्रामपंचायत सोनाळा येथील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरपंच व ग्रामसेवक (सचिव) यांच्या संगनमताने आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा संतोष उके यांनी थेट जिल्हा परिषद अकोला चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून खातेनिहाय सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, ३१ जानेवारी २०२४ पासून ग्रामपंचायतीच्या निधीच्या प्राप्ती व खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रोखपुस्तक, बँक पासबुक व ताळमेळ पत्रक यामध्ये विसंगती असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक आरोपांची मालिका
तक्रारीत पुढील गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे –
विकास कामांच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB) व पूर्णत्व प्रमाणपत्रात विसंगती
मनरेगा व इतर योजनांतील कामांचे मूल्यमापन काम पूर्ण होण्यापूर्वीच केल्याचा संशय
बनावट बिले व साहित्य खरेदीत अनियमितता
घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत अपारदर्शकता
ग्रामसभेच्या ठरावांमध्ये फेरफार झाल्याची शक्यता
शासन निर्णयांचे उल्लंघन करून मनमानी कारभार
तक्रारदारांच्या मते, या सर्व बाबी सामान्य प्रशासकीय चुका नसून आर्थिक गैरव्यवहार व अधिकारांचा दुरुपयोग असल्याचा ठोस संशय आहे.
“चौकशी करा अन्यथा आमरण उपोषण”
या प्रकरणी स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमून सर्व कागदपत्रे जप्त करावीत आणि दोषी आढळल्यास सरपंच व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सोनाळा ग्रामपंचायतीतील या कथित गैरव्यवहारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *