
अकोला | प्रतिनिधी
राज्यातील बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन व उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे २ कोटी ५० लाख प्रकल्पग्रस्तांची संख्या असून त्यापैकी सुमारे ४ लाख ५० हजार सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे. मात्र शासकीय भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी केवळ ५ टक्के आरक्षण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पात्र उमेदवारांना संधी मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.
यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी १५ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही झालेली नाही. दरम्यान अनेक प्रकल्पग्रस्त युवकांची ४५ वर्षांची वयोमर्यादा संपत चालली असून रोजगाराच्या संधीपासून ते वंचित राहत असल्याची खंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात सुरू असलेल्या विविध मेगा भरती प्रक्रियांमध्ये देखील प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित संधी मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले ५ टक्के आरक्षण वाढवून १५ टक्के करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर ९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात राज्यातील जास्तीत जास्त बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजय धनाडे यांच्यासह सुनील गावंडे, संतोष राठोड, विजय चव्हाण, राजेश दुतोंडे, राठोड गुरुजी, पियुष देशमुख, आशिष सुर्वे तसेच सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
