अकोट | प्रतिनिधी :
नागरिकांना शासनाच्या योजना, माहिती व तक्रार नोंदणीची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती अकोटने डिजिटल दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.

या वेबसाईटचे उद्घाटन दि. ६ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती अकोट कार्यालयात पार पडले.
जिल्हा परिषद अकोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रतिनिधी म्हणून सहायक गटविकास अधिकारी (पंचायत विभाग) श्री. हरिनारायण परिहार यांच्या हस्ते या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती अकोटचे गटविकास अधिकारी श्री. राजेश खुमकर उपस्थित होते.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सर्वप्रथम अकोट पंचायत समितीने अधिकृत वेबसाईट सुरू करण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि नागरिकांना माहिती मिळविणे अधिक सुलभ होणार आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून पंचायत समिती अकोट अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना विविध शासन निर्णय, महत्त्वाची संकेतस्थळे, विविध योजनांची माहिती, कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक तसेच तक्रार नोंदणी व तक्रारींच्या स्थितीची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याशिवाय पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रमांची माहिती तसेच विविध योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादीही नागरिकांना ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयात येण्याचा त्रास कमी होऊन वेळ व श्रमाची बचत होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट पंचायत समितीत विविध शासन उपक्रम व अभियान प्रभावीपणे राबविले जात असून, त्यांच्या संकल्पनेतूनच ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी राजेश खुमकर यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या माहिती व सोयीसाठी ही वेबसाईट तयार करून घेतली आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषद अकोला अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती अकोटमधील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या वेबसाईटच्या निर्मितीसाठी श्री. कुलदीप चोरे (तत्कालीन तालुका व्यवस्थापक) यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
