बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ लवकरच साकारणार
उत्पादनांत नाविन्य आणि वैविध्य आणण्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आवाहन

अकोला, दि. २० फेब्रुवारी : महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, बचत गटांनीही उत्पादनांमध्ये नाविन्य, वैविध्य आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे पं. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे आयोजित ‘वऱ्हाडी जत्रा’–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, “जिल्ह्यात २० कोटी रुपयांच्या निधीतून ‘उमेद मॉल’ उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी आणि विश्वसनीय बाजारपेठ मिळेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देश-राज्यात बचत गटांसाठी विविध अर्थसाहाय्य, विपणन सुविधा, ‘लखपती दीदी’ यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. महिला बचत गटांनी काळाची गरज ओळखून उत्पादनांमध्ये बदल घडवावा. बाजारपेठेचा अभ्यास करून इतरांचे अनुकरण टाळावे आणि नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण उत्पादने तयार करावीत.”
खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासन डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. बचत गटांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्पादने देशभर पोहोचवावीत. आमदार रणधीर सावरकर यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटवर भर देण्यात येत असल्याचे सांगितले आणि बाजारपेठेची गरज ओळखून वेगळेपण जपणारी उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उत्पादनांच्या उत्तम पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मानकीकरणावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्ह्यात सध्या १३,५२८ स्वयंसहायता गट कार्यरत असून, ५ हजारांहून अधिक लघु व्यवसायांना चालना मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध कक्षांना भेट देऊन बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला आणि उत्पादनांबाबत माहिती जाणून घेतली. या विभागीय प्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला, खाद्यपदार्थ इत्यादींच्या ७० दालनांसह वऱ्हाडी-मराठमोळ्या खाद्यपदार्थांची ३० दालने असे एकूण १०० दालने लावण्यात आली आहेत.

‘वऱ्हाडी जत्रा’ ही सरस प्रदर्शन २० फेब्रुवारीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली राहील. हे प्रदर्शन ग्रामीण महिलांच्या हुनर, स्वाद आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे महोत्सव ठरणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
