Join WhatsApp group

लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भाची अमरावती येथे ठोस भूमिका


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी
अकोला:-लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांमधील जाचक अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री वामनरावजी भिसे यांच्या नेतृत्वात तसेच पश्चिम विदर्भ महासचिव श्री प्रकाशभाऊ दांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे प्रादेशिक व्यवस्थापक श्री लाचारवार साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
महामंडळामार्फत गेल्या एक वर्षापासून सुविधा योजनेअंतर्गत प्रत्येकी रु. ५,००,००० (पाच लाख) कर्ज प्रकरणे ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने जिल्हानिहाय उद्दिष्टांच्या आधारे मंजूर करण्यात आली होती. मात्र शासनाने घातलेल्या जाचक अटी, अर्जदारांचा अनिवार्य आर्थिक सहभाग व हमी शुल्क भरण्याच्या नियमामुळे मातंग समाजातील अनेक इच्छुक लाभार्थी कर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. परिणामी, महामंडळाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होत असून समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात निराशा होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मातंग समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे अर्जदारांकडून अपेक्षित सहभाग रक्कम व हमी शुल्क भरणे अनेकांसाठी अशक्य ठरत आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेकांना कर्जाचा लाभ मिळत नाही. ही बाब सामाजिक न्यायाच्या तत्वांना धरून नसून शासनाने तातडीने या अटी शिथिल किंवा रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच लकी ड्रॉ प्रक्रियेत ज्यांचा क्रमांक लागला नाही, अशा अर्जदारांनाही पर्यायी मार्गाने तात्काळ न्याय द्यावा, जेणेकरून समाजातील होतकरू नागरिकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळेल आणि आर्थिक स्वावलंबन साधता येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
प्रादेशिक व्यवस्थापक श्री लाचारवार यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासन पातळीवर पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
लहुजी शक्ती सेनेने इशारा दिला की, जर शासनाने व महामंडळाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर समाजाच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *