अकोला (मुर्तीजापूर): ता. मुर्तीजापूर येथील ग्रामपंचायत अकोली जहागीर येथे 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत धक्कादायक प्रकार घडला. शासकीय कामकाज करीत असताना ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण चुडे यांना गावातील काही व्यक्तींनी भर ग्रामसभेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला असून संबंधित आरोपींनी यापूर्वीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधितांचे मनोबल वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून दोषींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने ग्रामपंचायत अधिकारी भयभीत वातावरणात काम करत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामसभा व ग्रामपंचायत कामकाजातून अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
प्रशासन आता तरी कारवाई करणार का, की शासकीय अधिकारी असुरक्षितच राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
