Join WhatsApp group

कर्जमुक्ती, हमीभाव व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे ! भारतीय किसान युनियनची जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर.

अकोला –पाच वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या ऐतिहासिक किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियन आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारने दिलेली लिखित आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय किसान युनियन अकोला जिल्हा शाखेने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान , मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. सुगतानंद भटकर, अकोला जिल्हा प्रभारी, भारतीय किसान युनियन यांच्या नेतृत्व व समाजसेवक गजानन हरणे, विजय देशमुख, गजानन कदम, नंदकिशोर गावंडे, सुरेश घोडके भारत कांबळे, व्ही व्ही इंगोले आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले . या निवेदनाद्वारे पाच वर्षांपूर्वीच्या आंदोलनात शहीद झालेल्या ७३६ शेतकऱ्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. आंदोलनाच्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करू असे वचन दिले होते. मात्र, आज पाच वर्षे उलटूनही त्या मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याने शेतकरी नाराज व अस्वस्थ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे कर्जमुक्तीचा निर्णय तातडीने घ्यावा, केंद्र सरकारने अकरा वर्षांपासून सर्वसमावेशक कर्जमुक्ती केली नसल्याने शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक ओझे वाढले आहे.
हमीभाव कायदा लागू करावा ,शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खात्रीशीर किंमत मिळावी यासाठी हा कायदा तत्कालीन आश्वासनाप्रमाणे लागू करणे अत्यावश्यक आहे.
वीज वितरणाचे खाजगीकरण थांबवावे ,वीज विभागाचे प्रायव्हेटीकरण शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असल्याचा ठपका संघटनांनी ठेवला आहे.
शेतकऱ्यांना 300 युनिट मोफत वीज व शेतीचा वाढता खर्च पाहता मोफत वीज पुरवठा हा काळाची गरज असल्याचे निवेदनात स्पष्टपणे नमूद आहे.
स्मार्ट मीटर बसविणे त्वरित बंद करावे , स्मार्ट बिलिंगमुळे अनियमित विजबिलांचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व मागण्यांची पूर्तता करावी
संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय किसान युनियनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनावर मा. नरेश टीकैत (राष्ट्रीय अध्यक्ष), मा. राकेश टिकैत (राष्ट्रीय प्रवक्ते), प्रदेशाध्यक्ष भाई चंद्रशेखर पाटील, प्रदेश महासचिव मावळा, रुपाली ताई पाटील, तसेच विदर्भ विभाग प्रभारी श्री. जगदीश जाधव पाटील यांचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. “वचनपूर्ती हीच शेतकऱ्यांप्रती खरी बांधिलकी”निवेदन सादर करताना समाजसेवक गजानन हरणे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला, पण त्याच शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर दिलेली सरकारी वचने पूर्ण होत नसतील तर त्यांचा विश्वास ढळल्यावाचून राहणार नाही. सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची नम्र विनंती.”अकोला जिल्हा भारतीय किसान युनियनने दिलेल्या या निवेदना मुळे शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्यांवर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले जावे व शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या अन्यथा संपूर्ण देशभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे शासनात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *