Join WhatsApp group

बदली विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

अकोला/ प्रतिनिधी: मोरगाव भाकरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका निता बिडवे यांच्या अकाली बदलीच्या निर्णयाविरोधात गावकर्‍यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवत जिल्हा परिषद कार्यालयास निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची तीव्र चिंता व्यक्त करत ही बदली तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिवाचे राण करून काम करणार्‍या निता बिडवे मॅडम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांचे शिक्षणातील योगदान लक्षात घेता त्यांची अचानक बदली करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावकर्‍यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच अर्चना गजानन चोपडे प्रविण भाकरे, भास्कर गवई, गितेश जंजाळ, अजय मोहिते, सचिन जंजाळ, गजानन चोपडे, मिथून जंजाळ, विनोद जंजाळ, मिलींद खंडारे, भगवंत भाकरे, निलेश जंजाळ, ज्ञानेश्वर माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शिक्षिकेवरील प्रेम आणि विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या बदलीमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल, शैक्षणिक प्रगती खुंटेल, असे मत मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, निता बिडवे मॅडम यांनी त्यांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त वेळ देऊन त्यांना स्पर्धा परीक्षा, निबंध लेखन, विज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. त्यांच्या बदलीने त्यांचे भवितव्य अडचणीत येईल, अशी त्यांना भीती आहे.
गावकर्‍यांनी प्रशासनाला हेही स्पष्ट केले की शिक्षिकेने प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेत त्यांना आत्मविश्वास दिला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांसाठी ती आधारवड ठरली. त्यामुळे तिच्या सेवेला मान्यता देत बदलीचा निर्णय पुनर्विचार करून रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना ग्रामस्थांनी संघटितपणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी प्रशासनाला हेही सांगितले की शिक्षिकेची बदली झाली तर शाळेचा शिक्षणाचा दर्जा खालावेल आणि मुलांचे भविष्य अंधकारमय होईल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील संवेदनशीलता लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.
ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘शाळेचा विकास थांबू नये, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षिकेचे योगदान अनमोल आहे. त्यामुळे तिची सेवा कायम ठेवावी.’
या आंदोलनामुळे शिक्षणासाठी समर्पित असलेल्या शिक्षकांविषयी समाजाचा आदर आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली. मोरगाव भाकरेसारख्या गावांनी शिक्षणाच्या गुणवत्तेच्या प्रश्नावर आवाज उठवणे हे समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *