अकोला : दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय अंतरिक्ष दिनानिमित्त जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षणाधिकारी यांच्या पुढाकाराने तसेच विज्ञान अध्यापक मंडळ व कुतूहल संस्कार केंद्र, अकोला यांच्या सहकार्याने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी आणि अंतरिक्ष संशोधनाची प्रेरणा मिळावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का प्रशांत देशमुख हिने दुहेरी यश संपादन करत महाविद्यालयाचा गौरव वाढविला. तालुकास्तरावर तिने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
जिल्हास्तरीय स्पर्धा “आर्यभट्ट ते गगनयान – पुरातन ज्ञान, अनंत शक्यता” या विषयावर पार पडली. यात अनुष्काने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्राला भेट देण्याची संधी दिली जाणार असून, अनुष्काने आपल्या अथक परिश्रमाने ही सुवर्णसंधी मिळवली आहे.
अनुष्काला या प्रवासात महाविद्यालयाच्या अध्यापिका सौ. सुप्रिया पडगिलवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या अद्वितीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विवेक डवरे, प्राचार्या प्रा. डॉ. सौ. रक्षा डवरे, तसेच शिक्षकवृंद श्री. विनय अंबादे, सौ. अरूणा नावकार, श्री. रोशन कोरडे, प्रीती पाटील, श्री. सुहास डोईफोडे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
✨ अनुष्काच्या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
