अकोला (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्याच्या भूमीवर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुनर्रचना कार्यक्रम अत्यंत थाटामाटात आणि सुबक नियोजनासह पार पडला. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी पतसंस्था हॉल, अकोला येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. नासिरुद्दीन अन्सार (माजी बीईओ, मूर्तिजापूर) यांनी केले,

तर अध्यक्षस्थान राष्ट्रीय सरचिटणीस साजिद निसार साहेब यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून अतहर परवेज (ADEI, तेल्हारा), हुसेन देशमुख (जिल्हाध्यक्ष, वाशिम), शेख मतीन (जिल्हाध्यक्ष, बुलढाणा), अब्दुल रियाज करीम (माध्यमिक जिल्हाध्यक्ष, बुलढाणा) तसेच नदीम राही (विभागीय अध्यक्ष, अमरावती विभाग) उपस्थित होते.

या कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेतून सुमारे 200 शिक्षकांनी सहभाग नोंदवला. महिला शिक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून आली. प्रखर उन्हाच्या परिस्थितीतही दूरवरून आलेल्या शिक्षकांनी संघटनेप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली.

यावेळी अकोला जिल्हा संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी शफीक खान राही, विभागीय कार्याध्यक्षपदी सैफुद्दीन, जिल्हाध्यक्षपदी शाहिद परवेज, जिल्हा सचिवपदी रिझवान काझी, जिल्हा कार्याध्यक्षपदी आबिद, जिल्हा खजिनदारपदी जुबेर, जिल्हा उपाध्यक्षपदी सद्दाम हुसेन आणि महिला अध्यक्षपदी हाजरा नूर ज़रयाब यांची निवड करण्यात आली.
तसेच तालुका स्तरावरही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. आकोट येथे मोहम्मद जावेद, बार्शी टाकळी येथे सय्यद इसरार, अकोला येथे सय्यद इफ्तेखार अली, तेल्हारा येथे शारिक अली, बाळापूर येथे सौद, मूर्तिजापूर येथे जुबेर अब्दुल नबी आणि पातूर येथे सोहेल अहमद खान यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
कार्यक्रमाला मराठी संघटनांच्या समन्वय समिती व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावून ऐक्य व सहकार्याचे दर्शन घडवले.
दरम्यान, TET आणि CTET परीक्षेत यशस्वी झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सद्दाम हुसेन यांनी TET संदर्भात थोडक्यात पण उपयुक्त मार्गदर्शन केले, ज्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुरेशी यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन शफीक खान राही यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
हा कार्यक्रम संघटनात्मक बळकटीसह शिक्षकांमधील ऐक्य, सहकार्य आणि शैक्षणिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
