Join WhatsApp group

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विषयावर बैठक संपन्न


दोन : येथील शासकीय विश्रामगृहात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विषयावर हिंदू दलित संघटनेची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते संजय भाऊ धनाडे हे होते.
या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले की, आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या आणि सर्वात गरजू घटकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. हा लढा केवळ एका जातीपुरता मर्यादित नसून संपूर्ण हिंदू दलित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. या समितीसमोर उपवर्गीकरणासंदर्भात विविध घटकांनी आपली भूमिका मांडावी व आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी निवेदन सादर करावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत उपवर्गीकरणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा व अंतिम निर्णय होईपर्यंत संघटित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी हिंदू दलित संघाचे उपाध्यक्ष उमेश लखन यांनी सांगितले की, समाजातील अनेक वंचित घटकांना आजपर्यंत आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सामाजिक, आर्थिक व राजकीय समतेसाठी उपवर्गीकरण अत्यंत आवश्यक असून शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
संघाचे सरचिटणीस गवई पाटील यांनी राष्ट्रीय चर्मकार संघटनेने या विषयात सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच वाल्मिकी समाजाचे चौधरी गुरुजी सारवान यांचा अयोध्या येथील श्रीराम मंदिरात गर्भगृह चौकट पूजन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
बैठकीस सतपाल एललंकार, आकाश सावते यांची उपस्थिती होती. संघाचे प्रचारक बाळकृष्ण गायकवाड यांनी आरक्षण विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत सर्व मागासवर्गीयांनी एकत्र येऊन या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा प्रचारक बाळासाहेब गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *