अकोला : दि. १२ (प्रतिनिधी) –
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जि.प. कर्मचारी युनियन आजपर्यंत सातत्याने लढा देत आली असून भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्व शक्तीनिशी काम करण्यात येईल, अशी ग्वाही युनियनचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी दिली.

स्वागत करताना जिल्हा परिषद युनियन चे अध्यक्ष गिरीश मोगरे
राज्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पुजरवाड यांनी अकोला जिल्हा परिषदेस पहिलीच भेट दिली. यावेळी जि.प. सभागृहात आयोजित कर्मचाऱ्यांच्या सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप खाडे होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, युनियनचे राज्य सरचिटणीस सुनील जानोरकर, राज्यस्तरीय पदाधिकारी राम मेहरे, जिल्हाध्यक्ष गिरीश मोगरे, सचिव राजेश मालगे, माजी अध्यक्ष विलास वरोकार, मधुकर बेलूरकर, मुकुंद पवनीकर, लेखा कर्मचारी संघटनेचे गजानन उघडे, रवींद्र मानकर, अभिजीत बन्नोरे, गजानन लव्हाळे आदी विचारमंचावर उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुजरवाड म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याबरोबरच इतर प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांशी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना सुनील जानोरकर यांनी संघटनेच्या बळकटीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप खाडे यांनी युनियनचे संस्थापक अध्यक्ष स्व. म. वा. ओंकार तसेच माजी अध्यक्ष बलराज मगर यांच्या कार्याचा गौरव करून संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
यावेळी दिगंबर लोखंडे, गिरीश मोगरे आणि राम मेहरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी अधिक सक्षमपणे काम करता यावे या उद्देशाने स्वतंत्र महिला संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी सामान्य प्रशासन विभागातील अधीक्षिका भारती देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, दिगंबर लोखंडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेला पुष्पक शहाणे, संतोष ताथोड, प्रवीण साखरे, तुषार पत्की, सुमेध चक्रनारायण, ओमप्रकाश बरेठी, शिरीष कुकडे, विनीत खंडारे, महादेव शिंदे, कैलास मसने, गजानन आगरकर, मोहम्मद कमरूजमा, शकुंतला चौबे, स्मिता नालीद, वंदना मेश्राम, उषा खेडकर, प्रीती खेडकर, शितल नाकट, सोनल सरोदे, अलकनंदा खर्चे, दिपाली गिन्हे, वैशाली ठाकूर, सरोज सावरकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संतोष ताथोड यांनी केले.
