Join WhatsApp group

अकोला: वऱ्हाडी जत्रा २०२६ चा समारोप उत्साहात; महिला स्वयंसहायता गटांनी रचली विक्रीची नवी उच्चांकी!


अकोला, २५ फेब्रुवारी २०२६: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, अकोला यांच्या वतीने आयोजित वऱ्हाडी जत्रा २०२६ (सरस विभागीय प्रदर्शन) चा पाच दिवसीय समारोप २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पं. लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे पार पडला. या जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांना शाश्वत उपजीविका आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश साध्य झाला असून, महिलांनी तयार केलेल्या हस्तकला, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या विक्रीतून विक्रमी 58 लाख 38 हजार रुपयांची विक्री झाली.
समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अकोला महापौर शारदा खेडेकर, आरबीआय नागपूर प्रादेशिक संचालक सचिन शेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) राजश्री कौलखेडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांची उपस्थिती होती.
महापौर शारदा खेडेकर यांनी उमेद अभियान अंतर्गत महिलांनी सक्षम होऊन स्वावलंबी उद्योग सुरू केल्याचे सांगितले. त्यांनी जत्रेला शुभेच्छा देताना महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले. .
प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे यांनी महिलांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग आणि मार्केटिंग रणनीती याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जत्रा यशस्वी झाल्याचे आणि महिलांच्या वस्तूंना खऱ्या अर्थाने बाजारपेठ मिळाल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी केली.
या पाच दिवसांत तब्बल १०० हून अधिक स्टॉल्सवर वऱ्हाडी खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि इतर उत्पादनांचे प्रदर्शन घडले. महिलांनी तयार केलेल्या पापड, लोणचे, कुरडया, हस्तकला वस्तू इत्यादींना मोठ्या प्रमाणात मागणी लाभली. ही विक्री महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वाची ठरली आहे.
उमेद अभियान अंतर्गत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळत असून, भविष्यात अकोल्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याची घोषणाही झाली आहे, ज्यामुळे कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होईल.
या यशस्वी आयोजनाबद्दल उमेद अभियान, जिल्हा प्रशासन आणि सर्व सहभागी महिलांचे अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *