अकोला (प्रतिनिधी) – लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे सुरू असलेल्या ‘वऱ्हाडी जत्रा २०२६’ या विभागीय मिनी सरस प्रदर्शनाचा दुसरा दिवस अक्षरशः उत्साहाच्या लाटेत न्हाऊन निघाला. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत आयोजित या जत्रेत हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून महिला बचत गटांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दुसऱ्या दिवशी जत्रेच्या मैदानावर पाय ठेवायला जागा उरली नव्हती. जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांच्या १०० हून अधिक स्टॉल्सवर वऱ्हाडी खाद्यसंस्कृती, पारंपरिक चविष्ट पदार्थ, मसाले, पापड, लोणची, हस्तकला वस्तू आणि ग्रामीण उत्पादनांची आकर्षक मांडणी पाहायला मिळाली

. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
याच वेळी जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी रंगमंचावर येत एक अनपेक्षित आणि थरारक क्षण निर्माण केला. लोकप्रिय हिंदी गाण्यावर त्यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण नृत्याने संपूर्ण मैदानात जल्लोष उसळला. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गजर आणि मोबाईल कॅमेऱ्यांचा वर्षाव—अशा वातावरणात काकड यांचा परफॉर्मन्स ठरला जत्रेचा हायलाइट!

त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिकारी आणि नागरिक यांच्यातील दरी क्षणात नाहीशी झाली. अनेकांनी त्यांना प्रेमाने ‘स्टार ऑफ द डे’ ही उपाधी दिली.

उपस्थित महिला बचत गट सदस्यांनीही आनंद व्यक्त करत, “अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आमच्यात मिसळणे ही मोठी प्रेरणा आहे,” अशी भावना व्यक्त केली.

या रंगतदार वातावरणाचा थेट फायदा महिला बचत गटांना झाला. त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी मिळाली असून अनेक स्टॉल्सवर विक्री विक्रमी झाली. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ही जत्रा प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
२४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणारी ही वऱ्हाडी जत्रा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि महिलांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणारा उत्सव ठरत आहे.
