३१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कुंभारी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवराय ग्रुप, कुंभारी व पांडे गुरुजी मित्र मंडळ, कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, एमआयडीसी, कुंभारी रोड, अकोला येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.
समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्तसाठा उपलब्ध व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास अकोला ब्लड बँकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यावेळी मनोजजी खंडेलवाल (अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन), कमलेशजी खंडेलवाल (उपाध्यक्ष), नितीनजी बियाणी (सचिव), विनीतजी बियाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी, रवी पोहनकार, किशोर आखरे, अभिषेक गावंडे, वासुदेव बिडकर, राजेश कोरडे, सेवानंद शिरसागर, गोपाल टापरे तसेच अकोला ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेत समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याचे आवाहन केले.
शिवरायांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ झाली असून, शिवराय ग्रुप व पांडे गुरुजी मित्र मंडळाच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. युवकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला
