जागृती शाळेत स्त्री आरोग्य जागृतीचा दीप प्रज्वलित – डॉ. रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
अकोला (प्रतिनिधी) –दिनांक ३१ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जागृती प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा येथे हळदीकुंकू व स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला जागृती शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका सौ. शोभाताई वखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अकोला शहरातील सुप्रसिद्ध व नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ. रेखा अभय पाटील उपस्थित होत्या. तसेच सहज योग मेडिटेशनच्या संचालिका सौ. अश्विनीताई भारती या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे हळदीकुंकू समारंभात सासू-सून तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या, ज्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक संस्कृतीचा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर रंग लाभला.
स्त्री आरोग्याबाबत सखोल मार्गदर्शन – डॉ. रेखा पाटील यांचा प्रभावी संवाद
प्रमुख वक्त्या डॉ. रेखा अभय पाटील यांनी स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारांची माहिती देत स्वच्छता, आहार, मानसिक आरोग्य, नियमित तपासणी आणि महिलांनी स्वतःकडे लक्ष देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत सुलभ व वैज्ञानिक पद्धतीने उत्तरे देत स्त्री आरोग्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
सहज योग मेडिटेशनच्या संचालिका सौ. अश्विनीताई भारती यांनी ध्यानधारणा (मेडिटेशन) चे जीवनातील महत्त्व स्पष्ट करत मानसिक शांती, तणावमुक्त जीवन आणि एकाग्रता वाढविण्यासाठी मेडिटेशन कसे उपयुक्त आहे यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. आदित्य शेगोकार यांनी करून कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि रूपरेषा स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या संचालिका सौ. शोभाताई वखरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्त्री सशक्तीकरण, आरोग्य जागृती आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. देशमुख मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. भारती कुडे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
