Join WhatsApp group

कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या विविध मागण्या मंजूर असूनही कार्यान्वित न केल्याने नाराजी

अकोला :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत मंजूर असलेली कामे स्वतंत्र यंत्रणेद्वारे करण्याचे उच्च न्यायालय व शासन निर्णयांनुसार निर्देश असतानाही जिल्हा परिषद यंत्रणेकडेच जबाबदारी ढकलली जात असल्याचा गंभीर आरोप कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांनी केला आहे.

सदर अभियंता संघटनेतर्फे जिल्हा परिषदेत निवेदन सादर करून नाराजी व्यक्त करण्यात आली. यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, मनुष्यबळाचा तीव्र अभाव असतानाही जिल्हा परिषद यंत्रणेला कामांचा प्रचंड भार टाकला जात आहे. यामुळे मंजूर कामे वेळेत पूर्ण न होता कामकाज ठप्प पडत असून, ग्रामीण विकासाच्या गतीवर परिणाम होत आहे.

मग्रारोहयो अधिनियम 2005 नुसार ग्रामपंचायतीमार्फत मजुरांना काम उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवकांची स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसारही ही कामे संबंधित मंजूर यंत्रणेकडूनच होणे अपेक्षित आहे. तरीदेखील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे अनावश्यकपणे कामे ढकलली जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

2008 च्या शासन निर्णयानुसार डोंगराळ भागातील उपविभागांना 250 लक्ष व इतर उपविभागांना 350 लक्ष इतकीच कामाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक कनिष्ठ अभियंता यांच्याकडे दहा पट जास्त कामे असल्याचे निदर्शनास आणले आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे.

तसेच, मग्रारोहयो अंतर्गत संपूर्ण कामे तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवकांकडूनच होणे अपेक्षित असतानाही ही कामे इतर यंत्रणेकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे जिल्हा परिषद अभियंते नाराज आहेत.

अभियंता संघटनेच्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, न्यायालयीन आदेश असूनही जिल्हा परिषद यंत्रणेस जबरदस्तीने कामे दिली जात आहेत. हा न्यायालयीन आदेशाचा भंग असून “आम्ही संपूर्ण कामे करण्यास तयार नाही, ती मग्रारोहयोच्या मंजूर यंत्रणेकडूनच करण्यात यावीत,” अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.

ग्रामीण विकासाच्या कामांना गती मिळावी, न्यायालयीन आदेशांचा भंग थांबावा व अभियंत्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी यावेळी अभियंत्यांनी केली. यावेळी प्रसन्‍न राठोड, रोहित यवले, कपील पवार,अनिता भगत धनश्री जानूनकर, शुभांगी बांबटकर, जया इंगोले, रशिका देशमुख, मोनाली कडव, निशीगंधा जवंजाळ गायत्री रत्‍नपारखी सदानंद नानोटे, गजानन पांडे, आदींची उपस्‍थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *