गावाला समृद्ध करण्याची संधी ; एकजुटीने प्रयत्न करा*
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. १७ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे राज्य स्तरीय उद्घघाटन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील किनगाव तालुका फुलब्री येथून राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री संजय शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते .अकोला जिल्ह्याचे उद्घाटन मा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते कापशी रोड ता अकोला येथून करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपल्या गावाला समृद्ध करण्याची संधी आहे. या अभियानातील उद्दिष्टांची पूर्तता करून गाव उन्नतीप्रत नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज कापशी येथे केले.
ग्रामविकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा तसेच राष्ट्रीय पोषण माह या उपक्रमांचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते कापशी रोड येथे विशेष ग्रामसभेत झाला, त्यावेळी ॲड. फुंडकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा सामान्य प्रशासन दिगंबर लोखंडे, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, सरपंच वेणूताई उमाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे, उपसरपंच अंबादास उमाळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते .
पालकमंत्री ॲड फुंडकर म्हणाले की, अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करून गावाचे व जिल्ह्याचे नाव राज्यात झळकावे, गावाची सर्वत्र आदर्श गाव म्हणून ओळख व्हावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे.
गावात सुशासन, सक्षम पंचायत,
जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव,
मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजिवीका विकास, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या उद्दिष्टांबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी यावेळी सर्व अभियान उत्स्फूर्त पने राबवावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, सीईओ अनिता मेश्राम, उपसरपंच अंबादास उमाळे यांनाही यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा शुभारंभ फलक प्रदर्शित करून करण्यात आला.
राष्ट्रीय पोषण माह उपक्रमानिमित्त विशेष प्रदर्शनाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. सुपोषणासाठी आवश्यक कडधान्य, भाज्या, पदार्थांची माहिती प्रदर्शनाद्वारे सादर करण्यात आली.
तालुकास्तरावरही मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. ग्रामसभेत प्रशिक्षकांकडून अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आणि पंचायत, दिगंबर लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन विकास पल्हाडे, तर आभारप्रदर्शन केंद्रप्रमुख बंडावर यांनी केले.
०००
